अकलूज – सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेच्या वतीने माढा तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांची बैठक शासकीय धान्य गोदाम, कुर्डूवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माढा तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच धान्य वितरण व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान माढा तालुक्यातील धान्य दुकानदारांनी आपल्या विविध समस्या जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने शासकीय गोदामातून धान्य दुकानदारांना ५० किलो ५०० ग्रॅम वजनाचे धान्य मिळावे, तालुक्यात उपलब्ध असलेला शिल्लक इष्टांक सर्व पात्र धान्य दुकानदारांना मिळावा, त्यामुळे पात्र व गोरगरीब लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नयेत, २०२२ मध्ये चलनाद्वारे जमा करण्यात आलेली रोख रक्कम लवकरात लवकर परत मिळावी तसेच धान्य वितरणाचे मार्जिन नियमितपणे आणि प्रति महिना मिळावे, अशा विविध मागण्या दुकानदारांनी मांडल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांनी दुकानदारांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ५० किलो ५०० ग्रॅम धान्य वजन करून मिळावे, यासाठी संबंधित पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. तसेच तालुक्यात उपलब्ध असलेला शिल्लक इष्टांक सर्व धान्य दुकानदारांना मिळावा, यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
२०२२ मध्ये चलनाद्वारे करण्यात आलेल्या रोख भरण्याच्या प्रश्नावर बोलताना मंडलिक म्हणाले की, या प्रकरणी सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेकडून जिल्हा पातळीपासून मंत्रालय स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. धान्य दुकानदारांची हक्काची रक्कम बुडणार नाही आणि ती लवकरात लवकर मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
धान्य दुकानदारांना मिळणाऱ्या मार्जिनच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. मार्जिन नियमितपणे आणि प्रति महिना मिळावे, यासाठी जिल्हा कार्यालयापासून मंत्रालयातील संबंधित वित्तीय विभागापर्यंत संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मंडलिक यांनी सांगितले. यापुढेही धान्य दुकानदारांना दरमहा मार्जिन मिळण्याच्या दृष्टीने संघटना प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कोणत्याही धान्य दुकानदाराच्या दुकानासंदर्भात अथवा परवान्याबाबत अडचण असल्यास तालुका अध्यक्ष गणेश बागल, जिल्हा संघटक मदन मुंगळे किंवा जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांच्याशी थेट संपर्क साधावा. संबंधित दुकानदारांची अडचण तातडीने सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.
दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये स्वच्छता राखावी, शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेले सर्व प्रकारचे फलक व बोर्ड लावावेत तसेच दुकानांचे परवाने वेळेत नूतनीकरण करून घ्यावेत, असे मार्गदर्शनही जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांनी बैठकीदरम्यान केले. लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देताना दुकानदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि दुकानातील व्यवस्था पारदर्शक ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीदरम्यान माढा तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ रेशन दुकानदार बंधूंच्या हस्ते सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक तसेच माळशिरस तालुक्यातील धान्य दुकानदार मिलिंद रेडेकर व अक्षय मिले यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच माढा तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने माढा तालुक्याचे पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री. जोशी यांचा सत्कार महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माढा तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश बागल, महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हा संघटक मदन मुंगळे,धान्य दुकानदार श्री. शिरसाट यांच्यासह माढा तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक उत्स्फूर्त वातावरणात पार पडली.
Post Views: 11