पंढरपूर – ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दिल्ली येथे जंतरमंतरवर येत्या ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलन करणार आहेत. दिल्ली येथील जंतरमंतर वरील आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातून सुमारे दीड ते दोन हजार ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती ऊस दर संघर्ष समिती सोलापूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली.
ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (दि.३०) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये आंदोलना संदर्भात माहिती देताना भोसले बोलत होते. या पत्रकार परिषदेस सचिन पाटील, प्राध्यापक सुहास पाटील, माऊली जवळेकर, अजित बोरकाटे, निवास नागणे, सालगुडे पाटील, समाधान पाटील व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
या वेळी माहिती देताना भोसले म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दिल्ली येथे जंतर-मंतरवर येत्या ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून पाठिंबा मिळत असून दिल्ली येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला व ऊस दरा बाबत झोपेची सोंग घेणाऱ्या भाजपा सरकारला जागे करण्याचे काम ऊस दर संघर्ष समिती करणार आहे अशी माहिती शेतकरी नेते दीपक भोसले यांनी दिली.
संपूर्ण देशामध्ये प्रत्येक वस्तुच्या किंमती मध्ये सध्या प्रचंड भाववाढ झालेली आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची भाव वाढ झालेले नाही. उसाला लागणारे खत व अन्य फवारणी खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्या मानाने ऊसाच्या दरा मध्ये अपेक्षीत वाढ झालेले नाही.
सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीनेच खाजगी साखर कारखान्यांमध्ये देखील मोठी वाढ झालेली दिसत आहे. खासगी कारखाने देखील अनेक राजकीय मंडळींचेच आहेत. राजकीय मंडळींकडून सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगी कारखानदारी उभी केली जात आहे. हे सर्व कारखानदार एकत्रित येऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रयत्न करीत होते. पण शेतकरी संघटनेने ह्यांचे मनसुबे उधळून लावले. वेळोवेळी उस दर आंदोलनाच्या माध्यमातुन आवाज उठवून कोट्यावधी रुपये ऊसदरवाढीच्या माध्यमातूनशेतकऱ्यांच्या पदरात पाडून देण्याचे काम देखील आम्हा शेतकरी संघटनेकडून केल्याचे देखील दीपक भोसले यांनी सांगितले.
सध्या ऊस क्षेत्र घटलेले आहे. त्यामुळे शेतकरी आणि उस तोडणी कामगार यांची वाईट अवस्था झालेली आहे. या ऊस उत्पादक आणि कामगारांचे काळजी घेण्यात यावी यासाठी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ५ व ६ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातील माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी व अन्य शेतकरी नेते मंडळी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. या आंदोलनानंतर ६ ऑक्टोबर रोजी वाणिज्य विभाग मंत्रालय तसेच सहकार मंत्रालय या मंत्रालयांना भेटी देवून शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भातील निवेदन दिले जाणार आहे.
——————–
चौकट : ( कारखाने बंद करणार : भोसलेंचा इशारा )
यावर्षी साखर कारखाने लवकर सुरू झाल्यास शेतकरी व कारखानदाराचे मोठे नुकसान होणार आहे. रिकव्हरी कमी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखानदाराने साखर कारखाने लवकर सुरू करू नयेत अशी आमची मागणी आहे. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधात कारखाने सुरू केल्यास हे सर्व ऊस कारखाने बंद पाडणार अशी ठाम भूमिका ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक भोसले यांनी व्यक्त केली.
————————
चौकट : ( जो पर्यंत निर्णय नाही, तो पर्यंत लढा सुरु राहणार )
गेल्या सात आठ वर्षापासून एमएसपी वाढवलेली नाही.एमएसपी न वाढवल्यामुळे सर्व कारखाने अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. या सर्व संघटना एकत्रित येवून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एकत्रित लढा देवून ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमातून लढला जात असून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडून मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. केंद्र सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार असल्याची माहिती दीपक भोसले यांनी दिली.
——————
चौकट : ( या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन )
साखरेची आधारभूत किंमत ५० रुपये करावी. उसापासूनच्या इथेनॉलचा दर ७५ रुपये प्रति लिटर करावा, साखर जीवना आवश्यक यादी मधून वगळण्यात यावी. घरगुती वापरासाठी लागणारी व उद्योगधंद्यासाठी लागणारा साखर कोटा वेगवेगळा निश्चित करून त्याचे दरही अनुक्रमे पन्नास रुपये व शंभर रुपये करावेत. दोन कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करावी आदीं प्रमुख मागण्यांचा यावेळी उहापोह करण्यात येणार आहे.
Post Views: 7