बार्शी – बार्शी शहरातील आगळगाव रोडवरील उद्योग भवनासमोर दूध विक्री करण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दि. २७ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडल्याची फिर्याद बार्शी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी तेजस सतीश परदेशी (वय २६, रा. भवानी पेठ, बार्शी) यांनी अभिषेक भगवान माने (रा. लहुजी चौक, बार्शी) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
तेजस परदेशी हे जय तुळजाभवानी दूध डेअरी, लहुजी चौक, बार्शी येथे काम करतात. दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ते कामावर गेले होते. रात्री दहाच्या सुमारास बाहेरगावाहून आलेले दूध मोटारसायकलवरून रिंगरोड परिसरात विक्री करण्यासाठी जात असताना आगळगाव रोडवरील उद्योग भवनासमोर त्यांना अभिषेक माने याने अडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, अभिषेक माने याने या परिसरात दूध विक्रीसाठी यायचे नाही, अन्यथा हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच दुकानासमोरील लाकडी काठीने डोक्यात व पाठीवर मारून जखमी केल्याचा आरोप तेजस परदेशी यांनी केला आहे.
घटनेनंतर तेजस यांनी घरी जाऊन आई-वडिलांना प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्याद देण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे पाठविले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.या प्रकरणी संबंधित प्रकरणाचा पोलीस हवालदार जी. एस. पोफळे अधिक तपास करत आहेत.
Post Views: 176