बार्शी – शहरासाठी अमृत-२ अभियानांतर्गत उजनी जलाशयातून राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाइन कामाला विविध ठिकाणी रस्त्याच्या हद्दी, शेतजमीन व अतिक्रमणाच्या प्रश्नांमुळे अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून कामाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली.
कंदर ते अकोले खुर्द फाटा या रा.म. क्र. ५६१-अ लगतच्या ३.५ किलोमीटर पाइपलाइनसाठी २५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्याच्या मध्यापासून ११.५० ते १२ मीटर अंतरावर सुमारे तीन मीटर खोलीवर पाईपलाइन टाकून इनकेसिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून त्यास नकार देण्यात आला. त्यानंतर सर्व्हिस रोडमधून पाइपलाइन टाकण्याचा पर्याय पुढे आला; परंतु संबंधित शेतकऱ्यांना जागेचा मोबदला न मिळाल्याने काम सुरु होऊ शकलेले नाही. अकोले खुर्द फाटा ते कन्हेरगाव येथील बाळूमामाचे मंदिर या ५.५ किलोमीटर मार्गासाठी बार्शी नगरपरिषदेने जिल्हा परिषदेकडे १५ लाख १२ हजार ५०० रुपये जमा केले आहेत. मात्र अद्याप लेखी परवानगी मिळालेली नाही. शेतकऱ्यांकडूनही रस्त्याच्या मालकीबाबत आक्षेप घेत कामास विरोध केला जात आहे.
टेंभुर्णी एमआयडीसी ते अंबड बीपीटीदरम्यानच्या १० किलोमीटरपैकी ३.१५ किलोमीटर काम अपूर्ण असून, उर्वरित भागातही शेतकऱ्यांचा विरोध आहे. अंबड बीपीटी ते बार्शीदरम्यानच्या ४८ किलोमीटरपैकी ३९ किलोमीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित नऊ किलोमीटरमध्ये अडथळे आहेत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित विभाग, शेतकरी आणि यंत्रणांमध्ये समन्वय साधून अडथळे दूर करावेत, अशी मागणी आमदार राऊत यांनी केली.
Post Views: 16