बार्शी – तालुक्यातील फफाळवाडी गावची कन्या नेहा रामचंद्र घाडगे हिने पुणे शहर पोलीस भरतीत यश संपादन करत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या नेहाला अखेर पहिल्याच प्रयत्नात मेहनतीचे गोड फळ मिळाले. तिचे वडील मार्केट यार्डात मुनीम म्हणून काम करीत आहेत.
नेहाने बी.कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती बी.एड.चे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक चाचण्यांची तयारी, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले.
तिच्या जिद्दीमुळे आणि कठोर परिश्रमांमुळे आज ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. नेहाचे वडील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत मुनीम म्हणून कार्यरत आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या नेहाने मिळवलेल्या या यशाचे फफाळवाडी गावासह परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, यार्डातील मुनीमाची लेक पोलीस झाली या बातमीने गावकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिचे सर्व स्तरांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे.




















