सोलापूर – अक्कलकोट भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखविल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी श्रीशैल बाबुराव हुळ्ळे (वय ३२, रा. सोलापूर) याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आमदार कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी कारने सोलापुरात महावीर चौकात आले होते. त्यावेळी त्यांचा कारचालक आनंद सुरवसे (वय ३०, रा. मोट्याळ, ता. अक्कलकोट) हा महावीर चौकातील प्युमा शोरूमबाहेर थांबला असता श्रीशैल हुळ्ळे व प्रभाकर फुलारी यांनी त्याच्याशी संपर्क साधला. “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, पुढचे मी बघतो,’ असे हुळ्ळे म्हणाला, तर फुलारीने त्याला दुजोरा दिला. याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते.
यापूर्वी पोलिसांनी सोलापूर-पुणे हायवेवरील इंदापूर टोल नाक्यावरून प्रभाकर फुलारी याला ताब्यात घेतले होते. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर सदर बझार पोलिसांच्या डीबी पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य आरोपी श्रीशैल हुळ्ळे याला कोल्हापूर-पुणे हायवेवरील किनी टोलनाक्यावरून जेरबंद करून गुरुवारी सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्या. पि. डी .चव्हाण यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यात आरोपीच्या वतीने ऍड. शरद पाटील, ऍड शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.
गुन्ह्याचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत हे करीत आहेत.
Post Views: 2