बार्शी – मानवी जीवनातील विविध भावभावनांचे इंद्रधनुष्य साध्या, सहज आणि ओघवत्या शब्दांत उलगडत मुक्ताईनगरच्या कवयित्री गुंजन पाटील यांनी बार्शीतील वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतील काव्यसंध्या कार्यक्रमात रसिकांची मने जिंकली. प्रेम, विरह, स्त्रीमन, सामाजिक वास्तव अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कवितांनी सभागृहातील वातावरण भावनांनी भारावून गेले.
कवयित्री गुंजन पाटील यांनी आपल्या काव्यातून स्त्रीच्या भावविश्वाचे विविध पैलू मांडताना तिच्या मर्यादा, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडविले. सहजसोप्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या कवितांमधून भोवतालच्या वास्तवावर भाष्य करणारी प्रगल्भ कवयित्री रसिकांसमोर उलगडत गेली. ‘आई व्हायचं नाही मला’ या कवितेने उपस्थितांना अंतर्मुख केले. यावेळी डॉ. सुमंगला देशपांडे, डॉ. क्रांती कोळी, माजी नगरसेविका विजयश्री पाटील, कल्पना अक्कलकोटे, मनिषा लोकरे, स्मिता देशमुख, राधिका कथले आणि दिपाली झालटे यांचा संयोजकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात अरुणा मनगिरे यांनी वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या महिला शाखेच्यावतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अपर्णा होनराव व प्रभाताई बेणे यांनी केले.
Post Views: 6