बार्शी – शहरातील गाडेगांव रोड परिसरात नवीन न्यायालयाच्या इमारतीजवळ अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या दोघांना बार्शी शहर पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तर न देता चोरी करण्याच्या उद्देशाने तेथील परिसरात थांबल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन नितनात हे पोलीस कॉन्स्टेबल पवार, साळवी आणि मुलाणी यांच्यासह सोमवार दि. ६ जुलै पहाटे नियमित नाईट पेट्रोलिंग करत होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गाडेगांव रोडवरील नवीन न्यायालयाच्या इमारतीजवळील डीवायएसपी कार्यालयाच्या बांधकामाच्या आडोशाला अंधारात दोन इसम संशयास्पदरीत्या लपून बसलेले दिसून आले.
पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी आपली ओळख सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी आपली नावे संदीप बबन शेंडगे (वय ४७) व अमन पैगंबर शेख (वय २१, दोघे रा. गाडेगाव रोड, बार्शी) अशी असल्याचे सांगितले.
सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांच्या हालचाली व परिस्थिती संशयास्पद असल्याने चोरी करण्याच्या उद्देशाने ते अंधारात लपून बसल्याचा संशय पोलिसांना आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १२२(क) अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.
Post Views: 5