बार्शी – शहरातील तुळजापूर नाका परिसरात पान खाण्याच्या निमित्ताने झालेल्या वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला करुन मारहाण केल्याची घटना रविवारी दि. ५ जुलै रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल तुकाराम कदम (वय २८, रा. कदम वस्ती, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते तुळजापूर नाका येथील केदारनाथ पान शॉपसमोर पान खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची ओळखीचा आरबाज रज्जाक सय्यद याच्याशी भेट झाली.
फिर्यादीनुसार, आरबाज सय्यद याने पान मागितल्याने राहुल कदम यांनी त्याला पान खाऊ घातले. त्यानंतर आरबाजने जेवणासाठी सोबत येण्यास सांगितले. मात्र, “माझ्याकडे पैसे नाहीत,” असे राहुल यांनी सांगितल्याचा राग मनात धरुन आरबाज सय्यद आणि त्याचा मित्र आदर्श ऊर्फ बबलू भोसले यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी आरबाज सय्यद याने तेथे पडलेला दगड उचलून राहुल कदम यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले, तसेच त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर जीवाच्या भीतीने राहुल कदम यांनी जवळील एका गोदामात आश्रय घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मात्र, आरोपींनी तेथेही पाठलाग करुन आरबाज रज्जाक सय्यद, आदर्श ऊर्फ बबलू भोसले आणि विष्णू सुरेश राजगुरु यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर राहुल कदम यांनी आपल्या भावांना माहिती दिली. त्यानंतर ते बार्शी शहर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठविले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी आरबाज रज्जाक सय्यद (रा. मांगडे चाळ), आदर्श ऊर्फ बबलू भोसले (रा. मांगडे चाळ) आणि विष्णू सुरेश राजगुरू (रा. तुळजापूर नाका, बार्शी) यांच्याविरुद्ध मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.
Post Views: 8