बार्शी – शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरु झाली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात नव्हे, तर थेट पोलीस ठाण्याच्या आत ठाणे अंमलदार कक्षातच दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सीसीटीव्ही स्क्रीन आणि खुर्च्यांची मोडतोड झाल्याची घटना सोमवार दि. ६ जुलै रोजी मध्यरात्री घडली. ही घटना पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयी असलेल्या भीतीच्या वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरत आहे.
अवघ्या आठवडाभरापूर्वी, २९ जून रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्यासमोर या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान अधिक तीव्र झाल्याची चर्चा सुरु आहे. पोलीस ठाण्याच्या आतच शासकीय मालमत्तेची मोडतोड होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, पोलीस ठाण्यातील साहित्यच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांची घरे, दुकाने आणि मालमत्ता कितपत सुरक्षित राहणार? त्यामुळे शहरातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही सुमारे दोन महिन्यांपूर्वी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर दोन गटांमध्ये मोठा संघर्ष होऊन ४० ते ५० जणांच्या जमावाकडून परस्परांवर दगडफेक झाली होती. या घटनेत पोलिसांसमोरच गोंधळ उडाला होता. मात्र, त्यावेळी कठोर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच आळा न बसल्याने काही समाजकंटकांचे धाडस वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, माजी उपविभागीय पोलीस अधिकारी IPS अंजना कृष्णा यांच्या काही दिवसांच्या कार्यकाळात बार्शी शहर व तालुक्यातील अनेक अवैध व्यवसाय आणि गुंड प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण आल्याचे दिसून आले होते. त्यांच्या बदलीनंतर नव्याने रुजू झालेले विभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप आणि शहराचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्यासमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक ज्येष्ठ नागरिक पूर्वी बार्शीत कार्यरत राहिलेले पोलीस निरीक्षक प्रकाश चव्हाण, दीपक सावंत आणि रामदास शेळके यांच्या कार्यपद्धतीची आठवण काढत असून, गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण ठेवणाऱ्या आणि कायद्याचा धाक निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याची शहराला गरज असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पोलीस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था, पोलिसांचा धाक आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
Post Views: 9