सोलापूर – उन्हाचा वाढता तडाखा फक्त माणसांनाच नव्हे, तर पशु-पक्ष्यांनाही होत आहे.विशेषतः पशु पक्ष्यांसाठी रखरखतं ऊन मारक ठरत आहे, कडक उन्हाने माणसांबरोबरच पशुपक्ष्यांचीही लाही लाही होत असून प्रत्येकजण आपापल्या परीने त्यावर उपाय शोधत आहेत.
दरम्यान रविवारी बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीने वाढत्या उन्हात हा दिलासादायक उपक्रम राबविण्यात आला असून गावातील झाडावर मातीची भांडी,टाकाऊ वस्तु पासून बनवलेले कृत्रिम घरटे, पाण्याची आणि धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून पक्षांच्या खाण्या-पिण्याची सोय होईल.
सध्या सोलापूरचं तापमान 41.3°अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे, जो तो उन्हाचा बचाव करण्यासाठी धडपड करीत आहे, अशा उन्हाळ्यात माणसाचे जगणं मुश्किल असताना प्राणीमात्रावर काय वेळ येत असेल,याची कल्पना करणं अशक्य आहे. म्हणूनच एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीने वाढत्या उन्हात पक्ष्यांना मुठभर धान्य आणि ओंजळभर पाणी उपक्रम राबविण्यात आला.
बाळे, शिवाजीनगर, खेड, गुळवंची, बाणेगाव, केगाव आदी पंचक्रोशीतील गावागावात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी एकत्व सोशल फाउंडेशनचे अमर बसवंती, शुभम जाधव, ऋषिकेश हरसुरे, चेतन झाडे, राजेश वाघमोडे, किरण सरवळे, राजेश केकडे, शहाबाज मकानदार, दीपक करकी आदी सदस्य उपस्थित होते.
अशी करा पक्ष्यांची सोय…
उन्हाळ्यात नागरिकांनी पक्ष्यांसाठी मदतीचा हात पुढे करावा, घरच्या छतावर गच्चीवर, अंगणात, माळ रानात, खिडकीजवळ, भिंतीवर, मंगल कार्यालय जवळ, किंवा झाडाच्या फांद्यांवर मडके तांब्या किंवा पाणी भरलेले भांडी ठेवावेत, जेणेकरून पक्ष्यांनापाणी सहज उपलब्ध होईल, शक्य असल्यास पक्ष्यांसाठी सावली निर्माण करावी झाडाखाली किंवा घरच्या छपरावर पाण्याचे भांडे ठेवले तर पक्ष्यांना उन्हाचा तडाकातून काहीसा दिलासा मिळेल.
दिपक करकी, प्रमुख एकत्व फाउंडेशन बाळे


















