सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील विविध कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे नमूद करून, या संदर्भात नगर विकास खात्याशी तातडीने बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीप्रमाणे कॅशलेस वैद्यकीय विमा योजना लागू करावी,
जीएसटी अनुदानात वाढ करून वेतन व पेन्शनसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, महागाई भत्त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित देणे तत्काळ अदा करावे, घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बदल करावा, ७व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देणे, बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे आणि पेन्शनसंदर्भातील प्रलंबित प्रश्न निकाली काढणे, यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, मार्गदर्शक इकबाल तडकल, सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल, खजिनदार अरुण म्हेत्रे, राम चंदनशिवे, सुनील शिंदे आणि पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






















