सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील प्रशासकीय कामकाज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी श्रीमती यशवंती धत्तुरे यांच्या नियुक्तीची वैधता, शासकीय फाईलींची हाताळणी आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कथित कमिशन घेतले जात असल्याच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी श्रीनिवास वसंत बनसोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे लेखी तक्रारद्वारे दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्येक फाईलच्या प्रक्रियेत संबंधितांकडून रक्कम घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शासकीय आवक-जावक नोंदवहीत अधिकृत नोंद न करता फाईली स्वीकारणे आणि त्यांची हाताळणी करणे सुरू असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे विभागातील फाईल प्रक्रियेची पारदर्शकता आणि प्रशासकीय नियमांच्या पालनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही तक्रारदाराने आक्षेप नोंदविला आहे. माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीत जन्मतारीख तसेच इतर महत्त्वाची वैयक्तिक व सेवाविषयक माहिती उपलब्ध झाली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे संबंधितांची नियुक्ती कोणत्या जाहिरातीद्वारे, कोणत्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे आणि कोणत्या सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाने करण्यात आली, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय फाईली स्वीकारण्याचे व हाताळण्याचे अधिकार कोणत्या प्रशासकीय आदेशाने देण्यात आले, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्रे, निवड प्रक्रिया, नियुक्ती आदेश आणि आजपर्यंतचे कामकाज तपासावे. तसेच संबंधित विभागातील आवक-जावक नोंदवही आणि फाईल मूव्हमेंट रजिस्टरची तपासणी करून आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.