धाराशिव – डॉ.व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये “फार्मा दशोध्याय 2026” हा बहुआयामी शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम आणि कवी तथा पत्रकार रवींद्र केसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संस्थेच्या विविध शैक्षणिक व विद्यार्थीहिताच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. सतीश कदम यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर कवी रवींद्र केसकर यांनी संत साहित्य, संस्कार आणि जीवनमूल्यांवर आधारित कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी नवोदय पॅटर्नचे जनक तथा जिल्हा परिषद आदर्श कन्या प्रशाला, तडवळा येथील वरिष्ठ शिक्षक जगन्नाथ धायगुडे आणि जिल्हा परिषद आदर्श मुलांची प्रशाला, तडवळा येथील सहायक शिक्षक बाळासाहेब जमाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी धायगुडे यांनी वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत यशस्वी आयुष्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले. तर बाळासाहेब जमाले यांनी सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि औषधनिर्मिती क्षेत्राचे देशाच्या प्रगतीतील महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विशेषतः GPAT परीक्षेत यश संपादन करणाऱ्या कु. फातिमा सिलावत (AIR 1914), कु. सोफिया बागवान (AIR 1929), कु. पूजा लोमटे (AIR 4188) आणि कु. निकिता देशमुख (AIR 4346) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अबोली ठाकूर निरवणे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुप्रिया सुरवसे यांनी मानले. या कार्यक्रमास डी.फार्म, बी.फार्म आणि एम.फार्म विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























