वेळापूर – माळशिरस तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ४ हजार ४२० शेतकऱ्यांचे २ हजार ५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. माजी आमदार राम सातपुते यांनी पाहणीनंतर त्यांनी तेथूनच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्याची ग्वाही दिल्याचे सातपुते यांनी सांगितले. महाळुंग येथे ४४ मिलिमीटर, तर इतर भागांत ११.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, पावसापेक्षा वादळी वाऱ्यामुळेच अधिक नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीस आलेल्या केळी व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील माळीनगर, संगम, बाभुळगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. माळीनगर नगर येथील शेतकरी वीरेंद्र कुरुडकर, संगम येथील प्रशांत ताटे देशमुख व बाभुळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी केली. केळीची संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कर्ज काढून उभी केलेली बाग क्षणार्धात उद्ध्वस्त झाली आहे.
Post Views: 15