सोलापूर : तब्बल ३०० हून अधिक निराधार व मनोरुग्ण व्यक्तींना आधार देऊन त्यांच्यावर औषधोपचार आणि त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या संभव फाउंडेशनच्या सचिवा राणी शिरसट यांना सेवासदन संस्थेतर्फे शुक्रवारी रमाबाई रानडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुक्रवारी सेवासदन संस्थेत त्रिवेणी संगम कार्यक्रम उत्साहात झाला.
महात्मा गांधी यांची जयंती, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि सेवासदन संस्थेचा ११७ वा वर्धापन दिन सेवा सदन संस्थेतर्फे साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश शिरसट, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, सचिवा वीणा पत्की, शालेय समितीच्या अध्यक्षा विद्या लिमये, अर्चना कुलकर्णी, ऍड. लक्ष्मीकांत गवई उपस्थित होते.
याप्रसंगी राणी शिरसाट यांना सेवासदन संस्थेतर्फे शाल, श्रीफळ, भेटवस्तू, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिक्षिका अश्विनी मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. यानंतर शिक्षिका रूपाली पवार यांनी राणी शिरसट यांची मुलाखत घेतली. संगीत शिक्षिका स्नेहल जोशी यांनी सादर केलेल्या ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी विद्यार्थिनी सानिका शिदोरे हिने महात्मा गांधी, सायली गायकवाड हिने माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तर प्रणाली साळुंखे हिने रमाबाई रानडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या सचिवा वीणा पतकी यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक अमित देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, प्राथमिक विभाग प्रमुख संजीवनी नगरकर, बालवर्ग प्रमुख निशिगंधा जाधव तसेच सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Post Views: 10