सोलापूर : प्रभाग क्रमांक १४ मधील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल) पाठीमागे असलेल्या पाणी टाकी परिसरात वाढलेले गवत, काटेरी झुडपे, कचरा तसेच नैसर्गिक विधीसाठी होत असलेला वापर होत असल्याचे चित्र नगरसेवकांच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले.
प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक तथा स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेविका अंबिका चौगुले, नगरसेविका सुनीता कामाटी आणि शंकर चौगुले यांनी अचानक या परिसराची पाहणी केली. यावेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील व्हॉल्व्ह तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत बसविण्यात आलेल्या उपकरणांच्या आसपासही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली.पाणी टाकीभोवती वाढलेले गवत व काटेरी झुडपे हटविणे, कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावणे, परिसराला मजबूत कुंपण करणे, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच पाण्याची गुणवत्ता व पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करणे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या टाकीतून प्रभाग क्रमांक १४, १७ आणि १३ मधील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी टाकीच्या परिसराची स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले.
महापालिका आयुक्तांनी स्वतः या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून केवळ तात्पुरती स्वच्छता न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही लोकप्रतिनिधींनी केली.
Post Views: 11