सोलापूर – भारताची माजी महिला क्रिकेट खेळाडू तसेच बी.सी.सी.आय.आयोजित वुमन्स प्रीमियर लीग मधील चॅम्पियन संघाचा म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक सुनेत्रा परांजपे यांनी हरिभाई देवकरण प्रशाला तसेच अकॅडमीतील क्रिकेट खेळाडूना मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनात त्यांनी खेळाडूंना खेळाबरोबर अभ्यास तसेच खेळातील सातत्य व नियमित सराव याचा संगम करून सराव करावयास सांगितले. सुनेत्रा परांजपे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना असे सांगितले की हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविलेले आहेत.
सोलापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर,अझीम खान व अनघा देशपांडे हे हरिभाई मध्येच घडलेले खेळाडू आहेत.या हरिभाई शाळेतील मैदानाचा व प्रशिक्षणाचा आपण पुरेपूर फायदा घेऊन आपले भविष्य उज्वल करावे व आपण देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारावी अशी इच्छा व्यक्त केली.
सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता कांगुणे यांच्या हस्ते सुनेत्रा परांजपे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य शांतप्पा कुंभार, ज्येष्ठ पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, डाॕ. मारुती शहाणे, क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे ,अक्षय गवळी व प्रकाश कंपली हे उपस्थित होते.




















