कुर्डुवाडी – भोसरे येथील गट क्र. ६२/२ मधील बळीराजा वन पाझर तलाव दुरुस्तीच्या मागणीसाठी बळीराजा वन पाझर तलाव समन्वय समितीने जाहीर केलेल्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला मोठे यश मिळाले आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत तलाव दुरुस्तीचे ₹ 43 लाख 38 हजार चे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.
मृद व जलसंधारण उपविभाग, मोडनिंब यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार, ८ ते १० दिवसांत तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), मोहोळ यांनी अंदाजपत्रक जिल्हा जलसंधारण अधिकारी, सोलापूर यांच्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविले असून, जिल्हा जलसंधारण विभागानेही प्रस्ताव तातडीने पुणे कार्यालयाकडे सादर केला आहे.
प्रशासनाने लेखी स्वरूपात कार्यवाही सुरू केल्याने बळीराजा वन पाझर तलाव समन्वय समितीने प्रस्तावित बेमुदत अन्नत्याग उपोषण रात्री उशिरा पत्र हाती येताच स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाला माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी श्रीपाद दळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब उबाळे, नगराध्यक्षा जयश्री भिसे, नगरसेविका, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, शेतकरी व ग्रामस्थांचा पाठिंबा लाभला. समितीने सर्वांचे आभार मानत तलावाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
चौकट
“१९७२ मध्ये उभारलेल्या या तलावाची ५३ वर्षांत दुरुस्ती झाली नाही. मात्र आता प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत करत उपोषण स्थगित केले असून, तलावाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत बळीराजा वन पाझर तलाव समन्वय समितीचा लढा सुरूच राहील.” पाठिंबा देणारा प्रत्येक व्यक्ती मोलाचा आहे सर्वांचे आभार.
हर्षल बागल
प्रमुख —बळीराजा वन पाझर तलाव समन्वय समिती, भोसरे
चौकट
संजयमामा यांचा फोन; श्रीपाद दळवे यांचे ते 7 तास निर्णायक
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी श्रीपाद दळवे यांनी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत सोलापूर येथील वन विभाग व जलसंधारण विभागाच्या कार्यालयात ठाण मांडून मंजुरी प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्याने अनेक दिवस प्रलंबित असलेल्या प्रक्रियेला गती मिळाल्याची भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.