सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींशी निगडित ऐतिहासिक विहिरीच्या सुशोभीकरणासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वळसंग येथील भीमनगर परिसरातील ही ऐतिहासिक विहीर सामाजिक समतेच्या चळवळीचे प्रतीक मानली जाते. या ऐतिहासिक स्थळाच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, विकासकामांना प्रारंभ झाला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांची सुरुवात करण्यात आली.
मात्र, उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आनंद चंदनशिवे यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
वळसंगच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यटनाच्या दृष्टीने या स्थळाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Post Views: 6