धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या “झाडे लावा, झाडे जगवा” या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशिव शहरातील नूतन बांधण्यात आलेल्या मुख्य बसस्थानक परिसरात नगराध्यक्ष सौ नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते तर विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण अभियानाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे, बसस्थानक परिसर अधिक हिरवागार करणे आणि “एक कर्मचारी – एक वृक्ष” हा संकल्प प्रत्यक्षात आणणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सांगितले.
वृक्षारोपण कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ नेहा राहुल काकडे म्हणाल्या की अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणासोबतच लावलेल्या रोपांचे संगोपन करून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी सौ.काकडे यांनी केले.
यावेळी नगरसेविका दिपाली धनंजय पाटील,नगरसेविका राजकन्या अडसूळ, धनंजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मथुरा जाधवर, विभागीय अभियंता राहुल पवार, विभागीय वाहतूक अधीक्षक संतोष कोष्टी,आगार व्यवस्थापक प्रवीण भोंडवे, स्थानक प्रमुख मुकेश कोमटवार, वाहतूक निरीक्षक याहिया काझी, यांच्यासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















