सोलापूर – महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करून आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी पदोन्नतीची नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. या सुधारणेमुळे जिल्हा परिषद सेवेत कार्यरत गट-ड (परिचर) कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक (पुरुष) पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र शासनाने नियम लागू करूनही सोलापूर जिल्हा परिषदेकडून अद्याप या संदर्भातील प्रत्यक्ष पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नसल्याने पात्र कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामविकास विभागाने १७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार गट-ड (परिचर) पदावर किमान तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेले कर्मचारी आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी पदोन्नतीस पात्र ठरणार आहेत. यासाठी विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच नियम लागू होण्यापूर्वी सेवेत असलेल्या आणि तीन वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या दहावी उत्तीर्ण परिचर कर्मचाऱ्यांनाही विशेष तरतुदीअंतर्गत पुढील पाच वर्षांपर्यंत पदोन्नतीची संधी देण्यात आली आहे.
सुधारित नियमांनुसार आरोग्य सेवक (पुरुष) पदावरील २५ टक्के पदे पदोन्नतीने आणि ७५ टक्के पदे थेट भरतीद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. पदोन्नती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. मात्र शासनाच्या या निर्णयानंतरही सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करणे, रिक्त पदांचा आढावा घेणे, विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेणे किंवा पात्र कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविणे यांसारखी कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तब्बल ९९ पात्र परिचर कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक (पुरुष) पदाची नियुक्ती मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. शासनाने स्पष्ट नियमावली जाहीर करून सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चौकट
आरोग्य विभागातील कर्मचारी संघटनांच्या मते, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषद स्तरावरील विलंबामुळे त्याचा अपेक्षित लाभ कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य यंत्रणेला मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता व सेवेची अट पूर्ण केली असूनही पदोन्नतीची प्रक्रिया रखडल्याने त्यांचे आर्थिक व सेवाविषयक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.
चौकट
सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाच्या सुधारित नियमांनुसार पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरू करून रिक्त पदे भरण्याची मागणी संबंधित कर्मचारी व संघटनांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण आरोग्य सेवेतील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता आरोग्य सेवक (पुरुष) पदांची नियुक्ती लवकरात लवकर झाल्यास प्राथमिक आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post Views: 10