छत्रपती संभाजीनगर : कामगार विभागामार्फत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक पदांच्या भरतीसाठी २९ व ३० जुलै २०२६ रोजी ऑनलाइन सरळसेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा छत्रपती संभाजीनगर येथील आयऑन डिजिटल झोन, चिकलठाणा तसेच आयऑन डिजिटल झोन, आयसीईईएम कॉलेज कॅम्पस, वाळूज या दोन परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे.
परीक्षा शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार परीक्षा केंद्र परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आवश्यक प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
कामगार आयुक्तालयाने उमेदवारांना आवाहन केले आहे की, ही परीक्षा मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या माध्यमातून पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा, निवड किंवा गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या भूलथापांना बळी पडू नये.
परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार, संशयास्पद हालचाल अथवा फसवणुकीचा प्रयत्न निदर्शनास आल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. परीक्षेची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि पवित्रता कायम राखण्यासाठी सर्व उमेदवारांनी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कामगार आयुक्तालयाने केले आहे.

















