टेंभुर्णी – अखिल भारतीय सरपंच परिषद, यावलती यांच्या वतीने ग्रामीण भागातील उत्कृष्ट व लोकाभिमुख कामगिरी करणाऱ्या सरपंचांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘ग्रामरत्न सरपंच पुरस्कार’ यावर्षी माढा तालुक्यातील चव्हाणवाडी (टें) ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती हनुमंत चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
निसर्गरम्य पाचगणी-महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष हुकूमचंद आमेद्रा, शिवव्याख्याते संभाजी मोहिते तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते स्वाती चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
चव्हाणवाडी (टें) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामविकास योजना आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे स्वाती चव्हाण यांनी अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास चव्हाणवाडी (टें)चे माजी सरपंच हनुमंत चव्हाण, संचालक नागेश खटके-पाटील, माजी उपसभापती प्रसिद्धी पाटील, माजी सरपंच नवनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष इंदलकर, अॅड. सचिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वाती चव्हाण यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे चव्हाणवाडी (टें) गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

























