सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले (मं) पासून हत्तरसंग कुडल पर्यंत असणाऱ्या सीना नदीपात्रात पाणी नसल्यामुळे नदीपात्र कोरडी पडली आहे . यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस, केळी, द्राक्ष, कलिंगड पपई व इतर फळ पिके उन्हाच्या तीव्रतेमुळे व पाण्याअभावी करपू लागली आहेत. त्यामुळे सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
यावर्षी अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला होता . त्यामुळे सीना नदी पात्राच्या चार ते पाच किलोमीटर परिसरात नदीचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . एप्रिल महिन्यापर्यंत सीना नदीपात्रात पावसाचे पाणी होते. मात्र एप्रिल अखेर नंतर मे महिन्यात सीना नदीमध्ये उजनी धरणाचे पाणी न सोडल्यामुळे नदीपात्र कोरडी पडली आहे . त्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील ऊस करपू लागली आहे . सहा ते आठ महिने उसाला पाणी देऊन उन्हाळ्यात नदीला पाणी नसल्यामुळे ऊस करपू लागल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे . याबरोबर केळी, द्राक्ष ,पपई ,कलिंगड व लिंबू यासह अनेक फळपिके ऊन्हाच्या तीव्रतेमुळे व पाणी नसल्यामुळे जळून चालली आहेत. त्यामुळे सीना नदी पात्रात त्वरित पाणी सोडण्यात यावे , अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
…
चौकट
…
सीना नदीमध्ये उजनीचे पाणी सोडावे
….
दोन महिन्यापासून सीना नदीत पाणी नसल्यामुळे नदीपात्र कोरडी पडली आहे. त्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे ऊस वाळून चालला आहे. आठ दिवसात ऊसाला पाणी न सोडल्यास संपूर्ण ऊस जळून जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उजनी धरणाचे पाणी सीना नदीत सोडण्यात यावे.
सुधाकर बिराजदार पाटील , शेतकरी, वडकबाळ, दक्षिण सोलापूर























