पंढरपूर – कन्या सासुऱ्यासी जावे । मागे परतोनि पाहे ।। तैसे झाले माझ्या जीवा । कधी भेटसी केशवा ।। या श्री तुकोबारायांच्या अभंगा प्रमाणे आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होवुन विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या लाखो वैष्णवांची सध्या अशी अवस्था झाली आहे. याचे कारण म्हणजे संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी (दिंडी) सोहळ्याचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश झाला असून गुरुवारी संध्याकाळी हे दोन्ही पालखी सोहळे दिंडी सोहळ्यातील शेवटच्या मुक्कामासाठी वाखरी येथे दाखल झाले. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आता पुण्यनगरी पंढरीकडे येण्याची ओढ लागली आहे.
वारकरी सांप्रदाया मध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आलेला आहे. येत्या शनिवारी (ता.२५ जुलै) आषाढी एकादशीचा महाउत्सव संपन्न होत आहे. दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायांचे पालखी सोहळे शेवटच्या मुक्कामासाठी गुरुवारी (ता.२३) संध्याकाळी वाखरी मुक्कामी दाखल झालेले आहेत.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मजलदरमजल करीत लाखों वैष्णव पंढरीच्या दिशेने येवू लागलेले आहेत. यात्रेच्या मुख्य दिवसांमध्ये गर्दीमुळे श्री विठ्ठलरुक्मिणीचे व्यवस्थीत दर्शन घडत नसल्यामुळे अनेक वारकरी दर्शन घेण्यासाठी पालख्यांमधून अगोदरच पुढे येत आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते भाविकांच्या गदीर्ने फुलून गेले आहेत. जसजसे हे पालखी सोहळे पंढरपूऱच्या दिशेने मार्गक्रमण करु लागलेले आहेत तस तशी या सोहळ्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांची विठ्ठल दर्शनाची भूख वाढू लागलेली आहे.
दरम्यान आषाढी यात्रेसाठी येथील व्यापारी तसेच फक्त यात्रा,जत्रें मध्येच व्यापार करुन उपजिविका चालविणारे बाहेरगावच्या व्यापाऱ्यांची देखील दुकाने थाटण्यासाठी सध्या लगबग दिसत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, तसेच मुख्य स्टेशन रस्त्यावरील छोट्यामोठ्या व्यावसायीकांची आपआपल्या दुकानांमधून यात्रेसाठी माल लावण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली दिसत आहे.
पालखी सोहळ्याबरोबर चालणारे भाविक सध्या पालखी सोहळ्या मधून पुढे येथे येवुन येथील मठ, धर्मशाळा तसेच मंदिर परिसरातील मोठ्या वाड्यांमधून आपल्या खोल्या आरक्षीत करीत आहेत. आपल्या बरोबर आणलेले सामान या खोल्यांमधून ठेवुन चंद्रभागा स्नान, विठुरायाचे दर्शन, नगरप्रदक्षिणा करुन पुन्हा पालख्यांमधून सहभागी होत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीतच पंढरीनगरीत संपुर्ण वातावरण भक्तीमय झाल्याचे दिसत आहे.
————————-
चौकट : ( पालख्यांचे शुक्रवारी पंढरपूरात होणार आगमन )
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा तर देहू येथून तुकोबारायांचे पालखी सोहळे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेले आहेत. मजल, दरमजल करीत हे दोन्ही संतांचे पालखी सोहळे दशमीच्या दिवशी शुक्रवारी (ता.२४) संध्याकाळी पंढरपूरात दाखल होता आहेत. दरम्यान संत मुक्ताबाईसह तसेच इतर अनेक संतांचे पालखी सोहळे येथे दाखल झालेले आहे.
—————–
चौकट : ( उपनगरांमधून देखील वारकऱ्यांची वर्दळ )
आषाढी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी येथे येत असतात. या वर्षी जिल्हा प्रशासनाने यात्रेच्या काळात गर्दी टाळण्यासाठी या बरोबरच येथे येणाऱ्या वारकऱ्यांना आधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंढरपूर शहरात सुक्ष्म नियोजन करीत रस्त्यांवरील अतिक्रमणे, आवश्यकता तेथे ऐकरी वाहतूक, मंदिर परिसरात नो व्हेईकल झोन, फेरीवाल्यांना रस्त्यांवर बसण्यास मज्जाव करुन यात्रेचे नेटके नियोजन केलेले आहे. त्यामुळे शहरात गर्दी असून देखील रस्त्यांवर वारकऱ्यांना चालताना कोणताही गर्दीचा त्रास जाणवत नाही.
प्रशासनाच्या या काटेकोर नियोजनामुळे वारकऱ्यांची वाहने तसेच वारकऱ्यांनी आपला मोर्चा उपनगरांकडे वळविल्याचे दिसत आहेत. त्यामुळे दरवर्षी पेक्षा उपनगरांमधून विशेष: रेल्वे स्टेशन, गणेश नगर, टाकळी रोड, मनिषा नगर, इसबावी भागातील उपनगरे, लिंकरोड परिसरातील उपनगरे आदीं भागात वारकऱ्यांची वाहने अधिक प्रमाणात दिसत आहेत. या बरोबरच वारकरी भाविकांचे जथ्थे देखील येथे वास्तव्यास असल्याचे दिसत आहे.
Post Views: 24