सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्या नादुरुस्त झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या कामांना बराच कालावधी लागणार असल्याने मंगळवार दि. २९ रोजी पासून शहरातील चार दिवसांआडचे पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवसाने पुढे जाणार असून, एक रोटेशन आता पाच दिवसांआड होणार आहे.
सोरेगाव ते जुळे सोलापूर एचएसआरदरम्यानची १२०० मिलिमीटर व्यासाची मुख्य पंपिंग जलवाहिनी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र परिसरात नादुरुस्त झाली आहे. त्याचबरोबर जामगुंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे रेल्वे ट्रॅकजवळ शहरांतर्गत पाणीपुरवठा करणारी ७६२ मिलिमीटर व्यासाची मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनीही नादुरुस्त झाली आहे. या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सोमवार (दि. २८) पासून सुरू करण्यात आले आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे उजनी पाइपलाइनवरून होणारा पाणीपुरवठा तसेच भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटलजवळील हायलेव्हल टाकीवर अवलंबून असलेल्या शहराच्या भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांनी केले आहे.
—
Post Views: 4