
सोलापूर – आगामी आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये संपन्न झाली. बैठकीत आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त येणारा शासकीय निधी पूर्णपणे पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि नियमानुसार खर्च करण्यात यावा, अशा सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अमृताताई वाघे, गटनेत्या रश्मी बागल, मुख्यकार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य सेवा, निवारा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीच्या यंत्रणेवर सखोल चर्चा करण्यात आली.
वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सुसंघटित व्हावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वारी काळात कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
Post Views: 11