सोलापूर – जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेसंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून शासनाच्या निर्देशानुसार समायोजन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. समायोजन प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या संबंधित संस्था, शाळा व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असून, संबंधित मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचे वेतन स्थगित केले जाणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यात एकूण ६३ अतिरिक्त शिक्षकांची नोंद करण्यात आली होती. शासन मान्यताप्राप्त आकृतिबंध व उपलब्ध पदसंख्येनुसार या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी काही शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले असून ९ शिक्षकांनी संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू होऊन कार्यभार स्वीकारला आहे. तथापि, उर्वरित शिक्षकांचे समायोजन अद्याप पूर्णत्वास गेलेले नसल्याचे आढळून आले आहे. सप्टेंबर २०२६ च्या संचमान्यतेनुसार राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेत सुमारे ३५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. शाळानिहाय उपलब्ध मनुष्यबळाचा संतुलित वापर, रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देणे तसेच शैक्षणिक कार्यात सातत्य राखणे, या उद्देशाने समायोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मात्र काही संस्था व शाळांकडून समायोजन आदेशांची अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रकरणांमध्ये समायोजित शिक्षकांना नियोजित शाळांमध्ये कार्यभार स्वीकारण्यास विलंब होत असल्याचेही आढळून आले आहे. यापार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने संबंधित संस्था व मुख्याध्यापकांना निर्देश जारी केले असून समायोजन आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. समायोजन प्रक्रिये संदर्भातील शासन आदेशांचे पालन न झाल्यास संबंधित संस्था, मुख्याध्यापक तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. तसेच आदेशांचे पालन न करणाऱ्या प्रकरणांमध्ये वेतन अदा करण्यास स्थगिती देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही शिक्षण विभागाच्यावतीने सांगितले आहे.
शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम व परिणामकारक वापर सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन निर्धारित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित सर्व संस्था, शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांनी समायोजन प्रक्रियेस सहकार्य करून आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 16