धाराशिव – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी एमपीएससी अध्यक्ष व सचिवांनी राजीनामा द्यावा, तसेच पेपरफुटीप्रकरणी एसआयटी चौकशी करून दोषी अधिकारी, संबंधित कंपन्या व अन्य जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. २०२१-२२ पासून सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असून नीट, एमपीएससी आणि ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.गोरगरीब विद्यार्थी दिवसाचे १२ ते १८ तास अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीच्या आरोपांमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील विद्यार्थी प्रथमेश देशमुख याचा संदर्भ देत सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रथमेश हा दहावी आणि अकरावीमध्ये टॉपर तसेच बारावीमध्येही उत्कृष्ट कामगिरी करणारा विद्यार्थी होता. स्पर्धा परीक्षेत वारंवार एक-दोन गुणांनी संधी हुकत असल्याने आणि पेपरफुटीच्या बातम्यांमुळे तो निराश झाला. त्याच्या आत्महत्येला केवळ वैयक्तिक घटना न मानता, या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
पेपरफुटीच्या प्रकरणात संबंधित कंपन्या आणि अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करावेत, दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सेवेतून बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी विद्यार्थी व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. पेपरफुटीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून मेहनती विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Post Views: 6