सोलापूर – निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पदवीधर मतदारांची नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समिती प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदवीधर मतदार म्हणून आपले नाव नोंदवावे, यासाठी गटविकास अधिकारी मनोज राजपूत यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत.
पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विहित नमुन्यातील नमुना क्रमांक १८ भरावा लागणार आहे. पंचायत समिती अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयाकडे २२ सप्टेंबरपर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पदवीधर मतदार नोंदणीच्या अर्जासोबत आधार कार्ड, मतदार ओळखपत्राची झेरॉक्स, विवाहित महिलांसाठी पतीच्या नावावरील पॅन कार्डची झेरॉक्स तसेच पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. तसेच सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडून अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली नोंदणी करून घेण्याबरोबरच विभागातील पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज भरला आहे की नाही, याची खात्री करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये पदवीधर मतदार नोंदणीबाबत जनजागृती करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. पात्र पदवीधरांनी मुदत संपण्यापूर्वी नोंदणी करून घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून माहिती देण्याच्या सूचना आहेत.
चौकट
ग्रामपंचायतींमध्ये जनजागृतीवर भर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदवीधर मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत यंत्रणा सक्रिय केली आहे. त्यामुळे ‘आपले नाव मतदार यादीत आहे का?’ याची खात्री करून पात्र पदवीधरांनी मुदतीपूर्वी नोंदणी करणे आवश्यक ठरणार आहे.
Post Views: 11