सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक उद्योजक दिवस साजरा करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थी आणि नव-उद्योजकांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी जेन झी विद्यार्थ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधत, आपल्या नवकल्पना कुठलेही दडपण न घेता आपल्या मातृभाषेत मांडाव्या असे आवाहन केले. तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती विद्यार्थाना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, तर व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव प्रा. डॉ. अतुल लकडे, नवोपक्रम नवसंशोधन आणि साहचर्यचे संचालक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, उद्यम फोंडेशनचे संचालक आणि उद्योजक अमित जैन आणि उद्यम फोंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुरांणी उपस्थित होते. यावेळी सभागृहात विद्यापीठाचे संवैधानिक अधिकारी, विविध संकुलाचे संचालक, इंनोव्हेशन सोसायटीचे सल्लागार अनिल वळसंगकर, विवेक मोगल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी केले, तर उदघाटनपर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमित जैन यांनी केले
यावेळी बोलताना कुलगुरूनी विद्यार्थांनी नवं उद्योजकतेकडे का वळावे आणि त्यासाठी विद्यापीठ आणि उद्यम फोंडेशन मध्ये उपलब्ध सुविधांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले, ज्यात वीसहुन अधिक प्रकल्प मांडण्यात आले होते. यानिमित्ताने आयोजित “नाविन्यपूर्ण आणि शाश्वत स्टार्टअपची बांधणी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात पुण्याच्या स्वामित्व हक्क सल्लागार खुशबू भुरट यांनी पेटंटवर, तर मुंबईचे श्री.आशिष कुलकर्णी आयडिया ते स्टार्टअप याविषयावर सत्रे घेतली.
शेवटच्या सत्रात आयोजित चर्चासत्रात स्थानिक उद्योजक राहुल बुऱ्हाणपूरे, सर्जेराव दोलताडे, चन्नवीर बंकूर आणि विनायक बंकापूर यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील ४०० पेक्षा जास्त विद्यार्थांनी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला. सभागृहातील जोश बघता डॉ. श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थी आणि मान्यवरांसोबात सोबत सेल्फी घेतली.
—–
Post Views: 22