सांगोला – काही शाळा, महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्था संविधान दिन साजरा करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील, तर अशा प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित संस्था व जबाबदार अधिकारी यांच्यावर प्रशासनाने नियमानुसार चौकशी करून कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सांगोल्यातील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी केली आहे. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा अधिकार दिला आहे. त्यामुळे संविधान दिन हा केवळ एक दिवसाचा औपचारिक कार्यक्रम न राहता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात संविधानाबद्दल आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा उपक्रम ठरला पाहिजे. तरी सांगोला तालुक्यातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे तसेच विविध शासकीय कार्यालयांनी संविधान दिन उत्साहात आणि व्यापक स्वरूपात साजरा करावा, असे आवाहन बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.