सोलापूर – शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर परिणाम होत असून, हजारो रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्यात यावी, या मागणीसाठी सोलापूर शहरातील सर्व रिक्षा संघटना एकवटल्या आहेत. या मागणीच्या समर्थनार्थ मंगळवार, दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यात २४ तासांचा कडकडीत रिक्षा बंद पाळण्यात येणार आहे.
यासंदर्भात आज दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयात सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (आडम मास्तर) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करून बंदची घोषणा केली.
सोलापूर शहरातील सर्व रिक्षा संघटनांच्या संयुक्त बैठकीत रिक्षाचालक व रिक्षामालकांच्या हक्कांचे आणि रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी ‘सोलापूर रिक्षा संघटना कृती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी कॉ. नरसय्या आडम मास्तर यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार परिषदेत बोलताना, बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, रिक्षाचालकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिक्षाचालकांच्या रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहनही करण्यात आले.
या मागणीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १ डिसेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांचा रिक्षा बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक आणि रिक्षामालकांनी सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
सोलापूरमधील सर्व रिक्षा संघटना एकाच व्यासपीठावर आल्याने रिक्षाचालकांच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्तपणे लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘आज नाही तर कधीच नाही! आमची एकच मागणी, बाईक टॅक्सी पूर्णपणे बंद झालीच पाहिजे!’ असा ठाम नारा देत रिक्षाचालकांच्या एकजुटीची ताकद दाखवून देण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेस विजय सोनवणे, आतिश शिंदे, रियाज सय्यद, सिद्राम चोपडे, विशाल लोंढे, महीपती पवार, मोहसीन बागवान, नरसिंग जोशी, दादा डूरके, राजू शिदगणे, तानाजी मसळकर, चांदसाब मुजावर, अखिल शेख, युसुफ शेख मेजर, ॲड. अनिल वासम आदी उपस्थित होते.
Views: 55