अक्कलकोट – उन्हाळी सुट्ट्या संपून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना विद्यार्थ्यांचे शाळेत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खैराट येथे शाळापूर्व तयारी अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आनंददायी आणि उत्सुकतेचा असतो. अनेक विद्यार्थी सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले असतात. शाळा सुरू होणार असल्याने ते पुन्हा आपल्या गावी परत येऊन नव्या उत्साहाने शाळेत हजेरी लावतात. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण मिळावे या उद्देशाने खैराट शाळेतील शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत शाळा परिसराची स्वच्छता केली.
शाळेच्या वर्गखोल्या, कार्यालय, व्हरांडा तसेच बाहेरील परिसरातील जवळपास दीड महिन्यांपासून साचलेला कचरा शिक्षकांनी काढून परिसर स्वच्छ केला. शिक्षक हातात झाडू, खराटा आणि टोपल्या घेऊन स्वच्छता करत असल्याचे पाहून ग्रामस्थांनीही त्यांचे कौतुक केले.
यावेळी रेखा सोनकवडे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना शाळा आनंददायी व प्रसन्न वाटावी, शाळेत प्रवेश करताच नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जाते. आपण स्वतः स्वच्छतेचे काम केल्यास त्याचे महत्त्व अधिक जाणवते आणि मनालाही समाधान मिळते.”
या उपक्रमात केंद्रप्रमुख श्रीहरी करपे तसेच शिक्षक सुनील होनाजे, फिरोजा नदाफ यांनी सक्रिय सहभाग घेत शाळा व परिसराची स्वच्छता केली. तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या आणि विद्यमान विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारीही करण्यात आली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शिक्षकांनी केलेल्या या उपक्रमामुळे शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक बनला असून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी अधिक उत्साह निर्माण होणार आहे.
Post Views: 6