धाराशिव – ज्या संविधानाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे राखीव मतदारसंघातील आमदार विधानसभेत पोहोचले, त्याच आरक्षणाच्या मूळ तत्त्वावर उपवर्गीकरणाच्या रूपाने संकट आले असताना हे आमदार मूग गिळून गप्प बसल्याचा घणाघाती आरोप भीमसैनिक राजाभाऊ राऊत यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राऊत यांनी राखीव आमदारांचा जाहीर पंचनामा केला. ते म्हणाले, “एससी उपवर्गीकरणाचा निर्णय बौद्ध, चर्मकार, खाटीक, ढोर, होलारसह सर्व अनुसूचित जातींच्या संविधानिक एकजुटीवर थेट हल्ला आहे. समाजाच्या हक्कांची राखरांगोळी होत असताना हे आमदार मात्र सत्ताधाऱ्यांची मर्जी राखण्यात धन्यता मानत आहेत. ही समाजाच्या कर्तव्याशी केलेली गद्दारी भीमसैनिक कदापि सहन करणार नाहीत.”
आमदारांना सुनावताना राऊत म्हणाले, “तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की केवळ आरक्षणावर जगणारे ‘राजकीय परजीवी’? बाबासाहेबांनी आरक्षण समाजाच्या वेदना विधीमंडळात घुमवण्यासाठी दिले, दरबारात मुजरे घालण्यासाठी नाही.” माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी समाजाची बाजू घेतली, मात्र बाकीचे आमदार पदे सांभाळण्यात लाचार बनल्याची टीकाही त्यांनी केली.
राजीनाम्याचा इशारा
“उपवर्गीकरणावर आमदारांचे रक्त उसळत नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत,” अशी मागणी राऊत यांनी केली. मौन पाळणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर कार्यक्रमांमध्ये संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवू, तसेच निवासस्थानाबाहेर शांततापूर्ण ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
आमदारांच्या उदासीनतेमुळे आता धाराशिवच्या भूमीतून आरक्षण बचावासाठी जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. गाव-खेड्यात जाऊन आमदारांचे पितळ उघडे पाडले जाईल आणि भीमसैनिक रस्त्यावर उतरून लढा अधिक तीव्र करतील, असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 5