पंढरपूर – सुमारे ११३ वर्षांपासून रखडलेल्या पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाच्या कामाला आता गती मिळत असताना या मार्गाचा फटका पंढरपूर शहरालगतच्या लक्ष्मी टाकळी, इसबावी आणि वाखरी परिसरातील नागरिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या भागातील सुमारे १६ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या परिसरात घरे बांधून वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ येणार असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान अनेक वर्षाच्या या भागातील वास्तव्यानंतर एकदमच हे संकट आल्याने या परिस्थितीत आता आम्ही जायचे कुठे ? असा उद्विग्न सवाल या भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. या मार्गासाठी पंढरपूर तालुक्यातील भूसंपादनाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. आता उर्वरित २० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून लक्ष्मी टाकळी, इसबावी आणि वाखरी परिसरातील जमीन संपादनासाठी संबंधित अधिकारी नुकतेच या भागात दाखल झाले होते.
———————
चौकट : ( चार दशकांपूर्वी घेतल्या जमिनी, आता विस्थापनाची भीती )
लक्ष्मी टाकळी, इसबावी आणि वाखरी हा परिसर गेल्या काही दशकांत पंढरपूर शहराचा विस्तार झाल्यामुळे उपनगर म्हणून विकसित झाला आहे. अनेक नागरिकांनी ३० ते ४० वर्षांपूर्वी या भागात जमिनी घेतल्या. त्यानंतर बंगले, घरे उभारून कुटुंबासह ते येथे वास्तव्यास आहेत. अनेकांचे या परिसरात व्यवसाय, उपजीविका आणि सामाजिक जीवनही रुजले आहे.
———————
चौकट : ( कॉरिडॉर नंतर रेल्वे मार्गाचे संकट )
एकीकडे पंढरपूर शहरातील मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरमुळे शेकडो नागरिक बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉरिडॉरला बाधित नागरिकांकडून विरोध सुरू असतानाच आता शहरा लगतच्या उपनगरातील नागरिकांवर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनामुळे विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
———-
चौकट : ( ऐवढ्या वर्षाच्या वास्तव्यानंतर आता जायचं कुठे?’)
रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘आम्ही गेल्या ४०-४५ वर्षांपासून या भागात राहत आहोत. घरं बांधली, संसार उभा केला. आता ही जमीन रेल्वेमार्गासाठी गेली तर आम्ही जायचं कुठे?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
———-
चौकट : ( पालकमंत्री, खासदार, आमदारांची भेट घेणार )
या प्रश्नावर परिसरातील नागरिक आता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान आवताडे यांच्याकडे निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. रेल्वे मार्गाचा विकास रखडू नये, मात्र त्यासाठी वर्षानुवर्षे या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन होऊ नये, यासाठी रेल्वे मार्गात आवश्यक बदल करावेत, अशी मागणी देखील केली जाणार असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.
——————
चौकट : ( विकासाला विरोध नाही; मात्र घरांवर बुलडोझर नको )
पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्ग हा पंढरपूरच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाला विरोध करण्यापेक्षा विद्यमान वस्ती, घरे आणि नागरिकांचे कमीत कमी नुकसान होईल, अशा पद्धतीने मार्ग आखावा, अशी भूमिका या परिसरातील नागरिकांमधून मांडली जात आहे.
Post Views: 7