सोलापूर – जिल्ह्यातील ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाकडून अपेक्षित दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्याचा गंभीर आरोप करत रायत क्रांती संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. जिल्हा परिषद सोलापूरच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीं रामप्पा चिवडशेट्टी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून पशुपालकांच्या विविध अडचणी मांडण्यात आल्या असून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. गावभेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याने जनावरांना आजार झाल्यास तत्काळ उपचार मिळत नाहीत. परिणामी काही ठिकाणी उपचाराअभावी जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारी यंत्रणेकडून त्वरित प्रतिसाद न मिळाल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे. खासगी डॉक्टरांकडून तातडीची सेवा मिळत असली, तरी त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे पशुपालकांवर आर्थिक भार वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.अनेक सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर अनुपस्थित असतात किंवा पशुपालकांनाच आजारी जनावरे वाहनाने दवाखान्यात आणावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून जनावरांच्या आजाराची तीव्रता वाढण्याचा धोका निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
पशुपालक आपल्या जनावरांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष अनिकेत वाघमारे आणि रमेश भोसले यांनी केली आहे.
चौकट
संघटनेच्या प्रमुख मागण्या :
प्रत्येक गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी सुनिश्चित कराव्यात.
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा मिळण्यासाठी हेल्पलाईन किंवा तत्पर यंत्रणा सुरू करावी.
सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांत डॉक्टरांची नियमित उपस्थिती बंधनकारक करावी.
गावागावांत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिरे नियमित आयोजित करावीत.
संबंधित अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवून जबाबदारी निश्चित करावी.
पशुपालकांना अनावश्यक त्रास होणार नाही यासाठी घरपोच सेवा अधिक प्रभावी करावी.



























