बार्शी – आषाढ शुद्ध एकादशी (देवशयनी एकादशी) निमित्त बार्शीतील श्री भगवंत मंदिरात श्री भगवंत-लक्ष्मीच्या दर्शनासाठी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. टाळ-मृदंगाचा गजर, “विठ्ठल विठ्ठल” आणि “ज्ञानबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने संपूर्ण बार्शी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
शनिवार दि.२५ जुलै रोजी पहाटे ३-३० वाजता काकड आरती झाल्यानंतर पहाटे ४ वाजल्यापासून श्री भगवंत-लक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. दर्शनासाठी महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन घेतल्याने बार्शी शहरातील प्रमुख रस्ते भाविकांनी गजबजून गेले होते.
सकाळी ७ वाजता श्री भगवंतांच्या गरुडारूढ उत्सवमूर्तीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. या नगरप्रदक्षिणेत मंदिरातील सेवेकरी, बडवे पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजता आकर्षक फुलांनी सजविलेल्या भव्य रथातून श्री भगवंतांच्या उत्सव मूर्तीची शहरातील प्रमुख मार्गांवरुन मिरवणूक काढण्यात आली. यापूर्वी आमदार राजेंद्र राऊत यांनी सपत्नीक श्री भगवंत उत्सव मूर्तीची पूजा करुन रथोत्सवाचा शुभारंभ केला.
रथाची सजावट अत्यंत आकर्षक व सुंदर फुलांनी करण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष स्व.श्रीकांत (आण्णा) पिसे यांनी सुरु केलेली रथ सजावटीची परंपरा त्यांच्या पश्चात पिसे परिवाराने आजही जपली आहे. महाद्वार चौकात रथ आल्यानंतर माजी नगरसेवक सोमनाथ पिसे, गणेश पिसे, अमोल पिसे यांनी रथावर पुष्पवृष्टी करुन श्री भगवंतांचे दर्शन घेतले.
रथोत्सवात वारकरी संप्रदायाच्या दिंड्या, टाळ-मृदंग पथके आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविक मंत्रमुग्ध होऊन सहभागी झाले होते. त्याचबरोबर अनेक लहान मुले-मुली वारकऱ्यांची पारंपारिक वेशभूषा करुन सहभागी झाले होते. डोक्यावर तुळस घेऊन व हातात भगवी पताका घेऊन अनेक महिलाही या रथोत्सवामध्ये सहभागी झालेल्या होत्या. दोरीच्या सहाय्याने भाविकांनी भक्तिभावाने रथ ओढला, तर शहरातील विविध चौकांमध्ये रथावर खारीक-खोबऱ्यांची उधळण करण्यात आली.
दरम्यान, शहरात आलेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक संस्था आणि मंडळांकडून ठिकठिकाणी उपवासाचा फराळ, फळे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्री भगवंत मंदिर परिसर तसेच रथोत्सव मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
Post Views: 5