सांगोला – सांगोला शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या कडलास चौकात वाहतूक कोंडीमुळे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, ही समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा किंवा कडलास मार्गे जतकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. कडलास चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, या चौकातून जतच्या दिशेने जाणारी अवजड वाहने वळवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता अरुंद असल्याने आणि वळणावर पुरेशी जागा नसल्याने ही मोठी वाहने चौकातच अडकून पडतात, परिणामी चारही बाजूंची वाहतूक तासनतास ठप्प होते. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे व उड्डाणपूल किंवा पर्यायी बाह्यवळण मार्गासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.