बार्शी – तालुक्यातील धसपिंपळगाव येथे अवैध दारुविक्री व विनापारवाना दारु साठवणुकीविरोधात बार्शी तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून देशी दारुच्या १७ आणि विदेशी व्हिस्कीच्या ४ अशा एकूण २१ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी संतोष अर्जुन धस (वय ५१) आणि आप्पा नामदेव भोळे (वय ७६, दोघेही रा. धसपिंपळगाव, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान धसपिंपळगाव गावातील पुलाजवळ रस्त्यालगत असलेल्या आडोशाला संतोष अर्जुन धस हा विनापारवाना देशी दारु जवळ बाळगलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ढोकी संत्रा कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ११२ सीलबंद बाटल्या जप्त केल्या.त्यानंतर सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्यांच्या दरम्यान गावच्या शिवारातील पवार वस्ती परिसरात आप्पा नामदेव भोळे यांच्या राहत्या घराजवळील आडोशाला विनापारवाना दारुचा साठा आढळून आला. पोलिसांनी या ठिकाणी क्लासिक गोल्ड व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४ बाटल्या (किंमत ६०० रुपये) आणि ढोकी संत्रा देशी दारुच्या १८० मिलीच्या ४ बाटल्या (किंमत ३२० रुपये) असा एकूण १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १ हजार १६० रुपये किमतीच्या २१ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलीस कॉन्स्टेबल गोविंद तुकाराम बचुटे यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपीविरूद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संतोष धस याच्यावरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खांडेकर, तर आप्पा भोळे याच्यावरील गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर करीत आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या आदेशाने सुरु आहे.
Views: 16