सोलापूर – ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांचा विकास आता लोकसहभागातून करण्याच्या दिशेने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची सद्यस्थिती तपासून जिल्हा परिषद शाळांच्या धर्तीवर ‘अ, ब, क आणि ड’ अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करून गरजेनुसार दुरुस्ती व विकासकामांना प्राधान्य देण्याचे नियोजन असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती चेतन सिंह केदार सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात एकूण ४३७ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे असून त्यांच्या इमारतींमध्ये सुमारे ३ हजार ५९ खोल्या आहेत. या उपकेंद्रांच्या दुरुस्ती व आवश्यक कामांसाठी तब्बल ३६ कोटी ७४ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. उपलब्ध निधीच्या विविध स्रोतांमधून अपेक्षित निधी उपलब्ध नसल्याने सर्वच उपकेंद्रांच्या दुरुस्तीचा प्रश्न एकाचवेळी मार्गी लावणे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.
त्यामुळे उपलब्ध शासकीय निधीवर पूर्णपणे अवलंबून न राहता लोकसहभाग, सामाजिक संस्था, उद्योजक, सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने उपकेंद्रांच्या विकासाला चालना देण्याचा पर्याय पुढे आला आहे. यासाठी प्रथम प्रत्येक उपकेंद्राची इमारत, छत, भिंती, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छतागृह, परिसर, रंगरंगोटी तसेच आवश्यक आरोग्य सुविधांची पाहणी करून त्यानुसार श्रेणी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
‘अ’ श्रेणीतील उपकेंद्रे तुलनेने चांगल्या स्थितीत असतील, तर ‘ब’ श्रेणीतील इमारतींना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असेल. ‘क’ श्रेणीतील उपकेंद्रांना मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व मूलभूत सुविधांची गरज असेल, तर ‘ड’ श्रेणीतील इमारतींच्या बाबतीत व्यापक दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे गरजेनुसार निधीचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करणे शक्य होणार आहे.
कोट
लोकसभागातून उपकेंद्र दत्तक
लोकसहभागातून एखादे उपकेंद्र दत्तक घेऊन त्याचा परिसर, इमारत व मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी सामाजिक संस्थांना आणि दानशूर व्यक्तींना सहभागी करून घेता येऊ शकते. मात्र, अशा कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि शासकीय निकषांचे पालन राहणे आवश्यक आहे. उपकेंद्रांचा विकास झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या वातावरणात प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती चेतन सिंह केदार सावंत यांनी सांगितले.
चौकट
तालुकानिहाय प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची स्थिती
तालुका
उपकेंद्रे
खोल्या
दुरुस्तीसाठी आवश्यक निधी (लाख रु.)
अक्कलकोट
३४
२३८
३१९.१९
बार्शी
४४
३०८
४४३.९५
करमाळा
३५
२४५
६२.००
माळशिरस
६९
४८३
७४४.३८
माढा
५०
३५०
२८५.१९
उत्तर सोलापूर
१६
११२
२२५.५७
मोहोळ
४१
२८७
२६८.३८
मंगळवेढा
३१
२१७
४६५.१४
पंढरपूर
४२
२९४
४६९.९५
दक्षिण सोलापूर
३१
२१७
५८८.३३
सांगोला
४४
३०८
३०२.३८
एकूण
४३७
३,०५९
३,६७४.४६
एकूण आवश्यक निधी : ३,६७४.४६ लाख रुपये म्हणजेच सुमारे ३६ कोटी ७४ लाख रुपये.
चौकट
माळशिरस, दक्षिण सोलापूरला सर्वाधिक निधीची गरज
माळशिरस – ७ कोटी ४४ लाख ३८ हजार रुपये
दक्षिण सोलापूर – ५ कोटी ८८ लाख ३३ हजार रुपये
मंगळवेढा – ४ कोटी ६५ लाख १४ हजार रुपये
Post Views: 24