अकलूज : गणेशोत्सवानंतर नीरा नदीपात्रात भग्न अवस्थेत पडलेल्या गणेशमूर्ती पाहून शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविला.
शितलदेवी मोहिते पाटील या पुण्याकडे जात असताना सराटी येथील नीरा नदीच्या पुलावरून नदीपात्रात मोठ्या संख्येने गणेशमूर्ती भग्न अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. भक्तिभावाने प्रतिष्ठापना केलेल्या या मूर्तींची अशी अवस्था पाहून शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या मूर्ती नदीपात्रातून बाहेर काढून त्यांचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्याचा विचार व्यक्त केला.
त्यानुसार शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीन फिंगर्स कम्प्युटर अँड सायन्स कॉलेज ग्रीन फिंगर्स कम्प्युटर अँड सायन्स कॉलेज तसेच विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थी, प्राध्यापक व सहकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून अस्ताव्यस्त पडलेल्या भग्न गणेशमूर्ती बाहेर काढल्या. त्यानंतर या मूर्तींचे योग्य ठिकाणी सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी श्रद्धेचा सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधला. गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना ज्या श्रद्धेने केली जाते, त्याच भावनेने त्यांना सन्मानपूर्वक निरोप देणे हीदेखील आपली सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
“अपूर्ण राहिलेल्या निरोपाला पूर्णत्व” देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचा प्रत्यक्ष अनुभव ठरला.श्रद्धा जपत नदीचेही संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी अनुकरणीय ठरला.
Post Views: 17