करमाळा – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मृतीनिमित्त मराठी पत्रकार दिन व मकरसंक्रांत सनानिमित्त तिळगुळ वाटप तसेच करमाळा नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार सन्मान सोहळा करमाळा अर्बन बँक व भाजपा करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा नेते तथा करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, व्हाईस चेअरमन गोरख जाधव, संचालक कलीम काझी, चंद्रकांत चुंबळकर, जितेश कटारिया, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रज्ञासेल तथा वंदेमातरम शक्तीसेनेचे अध्यक्ष सुहास घोलप, कार्यकारणी सदस्य बाळासो कुंभार, माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे, अर्बन बँकेचे व्यवस्थापक प्रकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सर्व पत्रकारांचा पत्रकारितेची निशाणी असलेला कलम अर्थात पेन, श्रीफळ, गुलाब पुष्प व बँकेची दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश लावंड व उपनगराध्यक्ष अतुल फंड यांचा अध्यक्ष व संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच हिंदू धर्मियांचा मुख्य सण मकरसंक्रांत हा तिळगुळ वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.
यावेळी बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांनी करमाळाचे पत्रकार हे निर्भीड व वास्तववादी पत्रकार आहेत असे कौतुक केले. करमाळा नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष यांनी आपल्या पदाचा योग्य वापर करून समाजाची सेवा करावी असे मत व्यक्त केले. तसेच सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार नासिर कबीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप, पत्रकार अशोक मुरूमकर, प्रफुल्ल दामोदर आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सर्व पत्रकार बंधू, भाजपाचे पदाधिकारी, बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश क्षीरसागर तर आभार सुहास घोलप यांनी मानले.


















