सांगोला – बौद्धिक विकासाबरोबरच संस्कार आणि नैतिकतेची जपणूक करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, हेच गुरुवर्य बापूसाहेबांच्या शिक्षणप्रसाराचे मुख्य ध्येय होते.मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा असून आजच्या काळात त्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांनी केले. सांगोला विद्यामंदिरच्या प्रांगणात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांच्या ४५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य चारुदत्त जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी ४५ वा स्मृतीसमारोह त्यानिमित्त घेतलेले विविध कार्यक्रम व सांगता समारंभ याची माहिती देत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही नामांकित शिक्षण संस्था आता अमृत महोत्सवी वर्षाच्या विशेष पर्वात आहे त्यामुळे वैविध्यपूर्ण आणि समाजोपयोगी कार्यक्रमातून अमृत महोत्सवी वर्ष समृद्धपणे साजरे करणार आहोत असे सांगत कार्यक्रमाचा हेतू सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले
यानंतर पुढे बोलताना प्रमुख पाहुणे युवराज पाटील यांनी बापूसाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा अतिशय प्रभावी शब्दांत वेध घेतला. गुरुवर्य बापूसाहेबांनी संस्कारांतून केलेली नैतिकतेची जपणूक, बौद्धिक विकासासोबतच मूल्यांची घातलेली सांगड, राष्ट्रध्वजाला सलामी देताना डबडबलेले त्यांचे डोळे आणि साने गुरुजींच्या सान्निध्यातून घेतलेली मूल्यांची शिकवण यांसारख्या विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. अभय बंग आणि अंतराळवीर कल्पना चावला यांसारख्या उत्तुंग कार्य करणाऱ्या महापुरुषांची व ध्येयवेड्या व्यक्तींची प्रेरणादायी उदाहरणे देत, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्टाचे सातत्य, संकटांना पायाखाली घेण्याची वृत्ती आणि अपयश पचवण्याचे सामर्थ्य विकसित करण्याचे आवाहन केले. ‘सर्वसामान्यांच्या पोरांना गमवायला शून्य, तर कमवायला अख्खं जग आहे; त्यामुळे मन, मेंदू आणि मनगट ताब्यात ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास कर्तृत्व सिद्ध व्हायला वेळ लागत नाही’, असा धारदार कानमंत्र दिला.
जगन्नाथ साठे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा.धनाजी चव्हाण यांनी ‘कै. बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.त्यानुसार कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार भागवत भाटेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी यांना पत्नी पोळ मॅडम यांचेसमवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ‘सांगोल्याचे बापूजी’ चरित्र ग्रंथ व रोख रुपये देऊन प्रदान करण्यात आला. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना भागवत भाटेकर म्हणाले हा सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून, माझ्या शिक्षक म्हणून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाची मनःपूर्वक दखल आहे. विशेष म्हणजे मी या शाळेचा विद्यार्थी आहे त्यामुळे हा सन्मान माझ्या कार्याला नवी ऊर्जा आणि अधिक जबाबदारीची जाणीव देणारा आहे.
यानंतर संस्थांतर्गत गुणवंत शिक्षक पुरस्कार सांगोला विद्यामंदिर प्रशाला मंगेश बबनराव म्हमाणे,सिताराम मारुती राऊत, ज्युनिअर कॉलेज प्रा.डी.के.पाटील, कोळा विद्यामंदिरचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोळा काकासाहेब तुकाराम पांढरे,नाझरा विद्यामंदिर प्रशाला ज्युनियर कॉलेज नाझरा रावसाहेब गोरख बंडगर, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय अविनाश विठ्ठल दिघे, इंग्लिश मेडियम स्कूलचे संगमेश्वर वैजीनाथ घोंगडे यांना प्रदान करण्यात आला. तसेच सांगोला विद्यामंदिरचे चांगदेव दिलीप कुंभार यांना गुणवंत लिपिक व मोहसीन शब्बीर मुजावर यांना गुणवंत सेवक पुरस्काराने सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप,शीलाकाकी झपके,विश्वेश झपके,प्रसाद झपके, संस्था सदस्य राजश्री झपके,अंजली झपके,झपके कुटुंबीय सांगोल्यातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, विद्यामंदिर परिवारातील सर्व आजी-माजी प्रशासकीय अधिकारी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले, तर आभार प्राचार्य चारूदत्त जगताप यांनी मानले.
*चौकट* – *भावपूर्ण समाधी दर्शन व प्रार्थनामय आदरांजली*
सकाळी ७ वाजता गुरुवर्य बापूसाहेबांच्या समाधीस्थळी अत्यंत पवित्र व भावपूर्ण वातावरणात समाधी दर्शन आणि प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या शांततेत सुमधुर प्रार्थनेतून आणि सर्वधर्मीय विचारांतून सर्वधर्मसमभावाचा उदात्त संदेश देण्यात आला. यावेळी निनादलेली ‘रामधून’, गीताईचे श्लोक आणि ‘अहिंसा, सत्य, अस्तेय’ या शाश्वत जीवनमूल्यांची आठवण करून देणाऱ्या भक्तीमय उपासनेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
समाधी दर्शनानंतर सकाळी ८ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे संस्था सदस्य व बापूसाहेबांच्या कन्या मंगलप्रभा कोरी व सांगोला विद्यामंदिरच्या १९६८ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुवर्यांच्या तैलचित्रास कृतज्ञतापूर्वक पुष्पहार समर्पित करण्यात आला यावेळी मानवतेचा व विश्वबंधुत्वाचा सर्वोच्च संदेश देणाऱ्या प्रार्थनेचा जागर करण्यात आला. अंतिमतः परम सत्याची प्रचिती करून देणाऱ्या ‘ओम् तत् सत्’ या सामुदायिक प्रार्थनेने या मंगलमय सत्राची सांगता झाली.
Post Views: 9