सोलापूर : होटगी रोडवरील रस्त्याचे काम तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने होत असल्याची तक्रार नगरसेवक अजहर हुंडेकरी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. आसरा चौक परिसरात खासगी ड्रेनेज लाईनवरच रस्ता बांधण्यात आल्याचा तसेच उंच स्टॉर्म वॉटर ड्रेनमुळे अनेक वस्त्यांकडे जाणारा मार्ग बंद झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
होटगी रोडच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती असून, या भागातील ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठ्याच्या भूमिगत पाइपलाइनवर अनेक ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच काही ठिकाणी ड्रेनेज चेंबर्ससाठी आवश्यक जागाही न सोडल्याने भविष्यात देखभाल आणि दुरुस्तीची अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
दरम्यान, या तक्रारीनंतर बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी कामातील त्रुटींवर आक्षेप नोंदवत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक बदल करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्याच्या कामासोबतच पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेचेही योग्य नियोजन करण्याची गरज अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
होटगी रोडवरील महिला रुग्णालयापासून होटगीपर्यंत सुरू असलेल्या नवीन रस्त्याच्या कामामुळे महापालिकेची पिण्याच्या पाणीपुरवठ्याची पाइपलाइन आणि ड्रेनेज व्यवस्था अनेक ठिकाणी बाधित झाली आहे. भविष्यात नागरिकांना पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थेचा त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेने सुमारे ९ कोटी रुपयांचा दुरुस्ती आराखडा तयार करून तो एमएसआरडीसीकडे सादर केला आहे. या दुरुस्तीचा खर्च एमएसआरडीसीकडून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
Post Views: 16