बार्शी – पर्यटन संचालनालय, प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे आणि लोकमंगल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आई’ पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी महिला उद्योजिका कर्ज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बार्शी येथील लिंगायत बोर्डिंग सभागृहात करण्यात आले. या मेळाव्यास महिलांचा व उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रमास लोकमंगल परिवाराचे प्रमुख तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पर्यटन संचालनालय, पुणेचे उपसंचालक भरत लांघी, प्रकल्पाधिकारी मयूर नांद्रे, बार्शी तालुका कृषी सहाय्यक शरद पाटील, कौटुंबिक समुपदेशक सौ. सुजाता अंधारे, प्रा. डॉ. वंदना यादव, लोकमंगल बँकेचे शाखेचे पालक संचालक जॉन चोप्रा, लोकमंगल पतसंस्थेचे संचालक समाधान पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंगल बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी लोकमंगल बँकेच्या विविध शासकीय कर्ज योजना, बँकेची वैशिष्ट्ये, लोकमंगल परिवाराची कार्यपद्धती तसेच महिला व उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक संधींची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी लोकमंगल पतसंस्थेच्या ‘महिला सन्मान योजने’चीही माहिती देण्यात आली.
बार्शी तालुका कृषी सहाय्यक शरद पाटील यांनी प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग योजनेची सविस्तर माहिती देत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, उपलब्ध संधी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून व्यवसाय विस्ताराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. वंदना यादव यांनी शासकीय योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नवीन व नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली. महिलांपर्यंत मोठ्या प्रमाणावर माहिती पोहोचविण्यासाठी शैक्षणिक संस्था व विविध सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करावा. ‘लोकमंगल हे योजनांची फॅक्टरी बनली पाहिजे’, तसेच आगामी ‘लोकमंगल संवाद’ उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्येही मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, अशी सूचना त्यांनी केली. शासकीय योजनांची मांडणी सर्वसामान्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांनी ‘आई’ पर्यटन कर्ज योजनेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असून महिलांनी या संधींचा लाभ घेऊन स्वतःची मालकीची व्यवसायिक ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या व्यवसायातील उत्पादने व सेवांचे प्रभावी मार्केटिंग तसेच प्रसार-प्रसिद्धी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विविध योजनांची माहिती घेण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रात ‘आई’ पर्यटन कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज वितरणासाठी लोकमंगल परिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी लोकमंगल परिवाराचे तसेच आमदार सुभाष बापू देशमुख यांचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष बापू देशमुख यांनी उपस्थित महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले. ‘आई’ पर्यटन कर्ज योजनेचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा, कुटुंबाची आर्थिक क्षमता वाढवावी आणि बार्शी परिसरातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले.
बार्शी तालुक्यातील महिला, युवक व उद्योजकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकमंगल परिवार सातत्याने मार्गदर्शन, आर्थिक सहकार्य आणि आवश्यक पाठबळ देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी, तर आभार लोकमंगल बँकेचे बार्शी शाखेचे पालक संचालक जॉन चोप्रा यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमंगल बँकेचे शाखाधिकारी प्रविण भोसले, लोकमंगल पतसंस्थेचे विभागीय अधिकारी नितीन म्हेत्रे यांच्यासह बार्शी विभागातील लोकमंगल परिवाराच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 10