सोलापूर : प्रभाग क्रमांक ४ मधील मुकुंदनगर, राजीव गांधीनगर आणि जम्मा वस्ती परिसरात काळसर व गढूळ पाणीपुरवठा झाल्यानंतर महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नवी जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
नगरसेवक अनंत जाधव यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे मागणी केली होती. कार्यवाही होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधील मुकुंदनगर, राजीव गांधीनगर आणि जम्मा वस्ती परिसरात काळसर व गढूळ पाणीपुरवठा झाल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत नगरसेवक अनंत जाधव यांनी संबंधित भागातील पाण्याचे नमुने बाटलीत भरून महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर माहिती देत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती. यावर आयुक्तांनी संबंधित विभागाला तात्काळ चौकशीचे आदेश देत समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते.
दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीनंतर मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या वार्षिक मक्तेदार के. बी. सगर यांच्या माध्यमातून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नगरसेवक अनंत जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर कामास सुरुवात झाली. येथील काळा पाणीपुरवठ्याचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक अनंत जाधव यांचे आभार मानले आहेत.
Post Views: 4