बार्शी – येथील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये मोत्यांचे दागिने तयार करण्याच्या कार्यशाळेचे उदधाटन ॲड. प्रणाली शेटे यांच्या हस्ते करण्यात आले झाले. प्रमुख पाहुण्या आणि प्रशिक्षक म्हणून राजश्री जायभाय उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम होते.
ही पाच दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि कौशल्य विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थिनीने शिक्षणाबरोबरच स्वतंत्र कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे कार्यशाळेच्या समन्वयक तथा ग्रंथपाल ज्योती यादव यांनी प्रास्ताविकात सांगितले.
ॲड. प्रणाली शेटे म्हणाल्या, विद्यार्थिनींनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या उपक्रम माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करुन स्वावलंबी व्हावे.
पहिल्या दिवशी प्रशिक्षक राजश्री जायभाय यांनी विद्यार्थिनींना दोन प्रकारच्या आकर्षक मोत्यांच्या राख्या तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या शेलगाव चौक येथील श्री गुरुदेवदत्त बहुउद्देशीय अनाथ मुला-मुलींच्या वारकरी संस्थेतील मुलांना बांधण्यात आल्या. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव आणि आपलेपणाची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून विद्यार्थिनींनी हस्तकौशल्य आत्मसात करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे आहे. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळून आत्मविश्वास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शिंदे यांनी केले. प्रेमा दळवी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, तर नंदा तुपे यांनी आभार मानले.
Post Views: 11