बार्शी – अश्लील फोटो व रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तसेच पैशांची मागणी करुन सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतल्याच्या आरोपावरुन बार्शी तालुका पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन, आरोपी अविनाश राजेंद्र उघडे याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(१), ६४(२)(M), ११९(१), ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ई), ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपीने तिला एका लॉजमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेतल्याचा आरोप आहे.
दरम्यान, ८ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीने फोन करुन पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने फिर्यादी आरोपीच्या घरी गेली. तेथे फोटो व रेकॉर्डिंग डिलीट करण्यासाठी आरोपीने तिच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केल्याचे तसेच तिच्यावर जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या लग्नासाठी निश्चित झालेल्या तरुणाला तिचे फोटो व संदेश पाठवून ते व्हायरल केल्याने लग्न मोडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Post Views: 5